मंगळवार, १९ मार्च, २०१३


♥“मायबोली मराठी आणि आपण”♥

- नवज्योत चंद्रशेखर  वेल्हाळ ===================================================================
नमस्कार मित्रमैत्रिणींनो......
आज २७ फेब्रुवारी . महाराष्ट्राचे आणि प्रेमिकांचे लाडके कवी , कविवर्य वि. वा. शिरवाडकर म्हणजेच आपले कुसुमाग्रज यांची आज जयंती. आजचा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो (निदान ओळखला तरी जातो). या निमित्ताने आपल्या मायबोलीशी संबंधित काही गोष्टींवर प्रकाश टाकावासा वाटतोय. विशेषत: आपल्या माय मराठीची सद्यस्थिती, त्या स्थितीला कारणीभूत घटक, आणि तिच्या सद्यस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी थोडी चर्चा.
कुठलीही भाषा ही तिथल्या स्थानिक संस्कृतीचा ‘मानबिंदू’ असते. तिथल्या लोकांची ओळख असते आणि सामाजिक बांधिलकी जपणारी एक अत्यंत प्रभावी गोष्ट असते. तशीच आपली मायबोली ‘मराठी’ आहे. आपली मातृभाषा आपला मानबिंदू आहे. ती आपली ओळख आहे. आपण तिचा योग्य तो मान राखलाच पाहिजे. पण आज आपल्या या मातृभाषेची अवस्था पाहिली कि मन विषण्ण होतं. कुसुमाग्रजांनी मराठीची सद्यस्थिती फार समर्पक शब्दांत वर्णन केली आहे... “मराठीच्या मस्तकावर राजमुकुट आहे , पण तिच्या अंगावरची वस्त्रं मात्र फाटलेली आहेत.” आणि मला असं वाटतं कि मराठीच्या या अवस्थेला आपण मराठी माणसंच जास्त कारणीभूत आहोत. कारण आपण आपल्या मातृभाषेला फारसं महत्व देतच नाही. मराठीच्या पदरात पदोपदी उपेक्षाच पडते आहे . या महाराष्ट्रातच मराठी उपरी ठरते आहे. याचं कारण मराठी माणसाच्या मनातलं मातृभाषेबद्दलचं कमी  होत चाललेलं प्रेम , ओढ आणि नाहीसा होत चाललेला स्वाभिमान . कुसुमाग्रजांनीच म्हटलं आहे .... “मातृभाषेची उपेक्षा करणे हे ‘सांस्कृतिक दारिद्र्याचे’ लक्षण आहे.” ह्या दृष्टीकोनातून पाहिल्यास आज मराठी माणूस सांस्कृतिक दृष्ट्या किती दरिद्री होत चाललेला आहे या भीषण वास्तवाची कल्पना आपल्याला निश्चितच येईल.
आज मराठी माणूस उच्चशिक्षित होतोय. वेगवेगळया क्षेत्रांमध्ये मोठ मोठ्या हुदद्यांवर काम करतोय. यशाची नवनवीन शिखरं गाठतोय. पण दुर्दैवाने आपल्या मातृभाषेपासून मात्र दिवसेंदिवस लांब जातोय. उच्च शिक्षित मराठी माणसाला आज मराठीत बोलण्याची लाज वाटते. मातृभाषेत बोलणं त्याला कमीपणाचं वाटू लागलंय. शाळा, महाविद्यालये किंवा सार्वजनिक ठिकाणी मराठीत न बोलता इंग्रजीत बोलून आपला प्रभाव पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न आज अनेक महाविद्यालयीन तरुण - तरुणी करताना दिसतात. जागतिकीकरणात सक्रीय राहण्यासाठी इंग्रजी महत्वाचं आहे हे नि:संशय खरं आहे पण त्याच बरोबर आपली मुळे जपण्याची नैतिक जबाबदारीही आपल्यावर असते हे विसरून चालणार नाही. आपली मातृभाषा आपणच जपली पाहिजे . इथे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आवर्जून द्यावसं वाटतं. आपली मातृभाषा जपण्याच्या बाबतीत आपण मराठी माणसं जरी उदासीन असलो तरी बाहेरच्या देशातून(अमेरिकेतून) आलेल्या एका स्त्रीने मात्र मराठीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे. आणि ती स्त्री म्हणजे डॉ. मॅक्सिन बर्न्सन. यांनी साताऱ्यातल्या फलटण येथे ‘प्रगत शिक्षण संस्था’ नावाची संस्था सुरु केली. गेली ४५ वर्षे त्या भारतात वास्तव्याला आहेत. त्याचं मराठीवरचं प्रभुत्व पाहिलं कि थक्क व्हायला होतं. काही दिवसांपूर्वी एक मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार केला. आजही त्या वयाच्या ७८ व्या वर्षी मराठीसाठी झटत आहेत. त्यांच्या कार्याची ओळख होण्यासाठी पुढील संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.
http://www.pragatshikshansanstha.org/indexIE.php?lang=Marathi
 एक बाहेरच्या देशातून आलेली स्त्री जर इथल्या संस्कृतीशी इतकी एकरूप होऊन इथल्या भाषेच्या उत्कर्षासाठी काम करत असेल तर महाराष्ट्रातच जन्मलेले आम्ही आमच्या मातृभाषेप्रति एवढे निष्काळजी आणि उदासीन का ?
मराठी आपली ‘मातृभाषा’ आहे. ‘मातृ’ म्हणजे ‘आई’. आपल्या आईकडून आपल्याला संस्कार स्वरुपात  मिळालेली भाषा म्हणजे ‘मातृभाषा’. दुसऱ्या अर्थाने पहायचे झाल्यास जी भाषा आपल्याला आपल्या आई इतकीच जवळची वाटते , ज्या भाषेला आई इतकेच महत्व दिले जाणे अपेक्षित आहे ती भाषा म्हणजे ‘मातृभाषा’. पण आजची मराठी माणसांची मानसिकता पाहता आपली मातृभाषा आपल्याला आई इतकीच जवळची आणि प्रिय वाटते का ...? आपल्या मातृभाषेला आपण आई इतके महत्व देतो का...? हे प्रश्न अगदी आवर्जून पडतात. मातृभाषेमध्ये जर ‘मातृ’ म्हणजेच ‘आई’ चा उल्लेख असेल तर तिची उपेक्षा करून आपण एका अर्थाने आपल्या आईचीच उपेक्षा करीत आहोत असे तुम्हांला नाही का वाटत ...?
आपण नेहमीच जागतिकीकरणाच्या गोष्टी करत असतो. आज गरज आहे ती आपल्या मातृभाषेला जागतिकीकरणात एक महत्वाचं स्थान निर्माण करून देण्याची. मराठी चित्रपट, नाटकं, मराठी दूरचित्र वाहिन्या यासाठी काही ना काही करत असतातच. पण एक सामान्य मराठी माणूस म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडलीच पाहिजे. 
सध्याचं युग हे ‘संगणक युग’ म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे या क्षेत्रातही मराठीला महत्व प्राप्त होणे गरजेचे आहे.  आज आंतरजालावर (INTERNET) अनेक लेख आणि माहिती मराठीतही उपलब्ध आहे. संगणकावर मराठीत लिहिणे अनेकांना चांगले जमते. पण आंतरजालावर (INTERNET) मराठीत लिहिणे काही जणांना अवघड वाटते. पण त्यात अवघड असे काहीच नाही. आज बाजारात मराठी अक्षरे असणारे UNICODE कळफलक उपलब्ध आहेत. तरीही कुणाला जर ते अवघड वाटत असेल तर सुपरिचित गुगल ने फोनेटिक मराठी टंकलेखनासाठी “Google Marathi Input Tool” उपलब्ध करून दिले आहे. हे साधन वापरून संगणकावर , विशेषत: आंतरजालावर मराठीत लिहिणेही अत्यंत सोपे झाले आहे. पण दुर्दैव हे कि तरीही अनेक जण ह्या गोष्टीला पाहिजे तितके महत्व देत नाहीत. कारण मातृभाषेलाच तेवढे महत्व देण्याची त्यांची मानसिकता नसते. याचं खरंच खूप वाईट वाटतं.
संत ज्ञानेश्वरांनी “अमृतातेही पैजा जिंके” अशी मराठीची महती वर्णन केली आहे. कवी सुरेश भटांचे ‘मराठी अभिमान गीत’ ऐकताना मायबोली मराठी बद्दलच्या अभिमानाने ऊर भरून येतो. स्वा. सावरकरांनी अनेक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधून ही भाषा आणखी समृद्ध करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. 
आपण अनेक सणांच्या शुभेच्छा इंग्रजीत देतो. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा आपण इंग्रजांच्या भाषेत देतो. केवढी ही उपरोधीकाता ...!! अरे , आपण इंग्रजांपासून स्वतंत्र झालो ना , मग त्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा आपण त्यांच्याच भाषेत द्यायच्या ...? दिवाळी किंवा मकर संक्रांति किंवा गुढी पाडवा यांसारख्या अस्सल भारतीय सणांच्या शुभेच्छा आपण परकीयांच्या भाषेत देतो. आपल्या सणांच्या शुभेच्छा देण्याइतकीही आपल्या मातृभाषेची पात्रता नाही का ...? आपली मातृभाषा आपल्याला इतकी परकी झाली...? “मराठीत शुभेच्छा द्याव्यात” असं जर कुणाला सांगितलं तर त्यांचा एक ठरलेला युक्तिवाद असतो.... “भाषेपेक्षा भावना महत्वाच्या”. एकदम मान्य. पण त्याच भावना आपण मातृभाषेतून व्यक्त केल्या तर काही बिघडेल का ...? मला तर वाटतं जेव्हा आपण आपल्या भावना आपल्या मातृभाषेतून व्यक्त करतो तेव्हा त्या आपल्या अंत:करणापासून उमटलेल्या असतात आणि म्हणूनच त्या खऱ्या असतात. माझा कुठल्याही भाषेला विरोध नाही पण मराठीला प्राधान्य मात्र नक्की आहे.
मराठीच्या नावावर आज बरेच जण (विशेषत: राजकीय पक्ष) राजकारण करताना दिसतात. मराठीशी संबंधित रोज नवे नवे वाद उठत आहेत. हे पाहून खूप विषाद वाटतो. ‘ब्रेकअप के बाद’ या गीत संग्रहातील ‘विडंबनात्मक भजनामध्ये’ दोन सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या ओळी आहेत.... 
“मराठीचा वाद नको संवाद घडावा...
ज्ञानोबांचा वेलू उंच गगनी चढावा...”
आज खरंच मराठीचे ‘वाद’ होण्याऐवजी मराठीत ‘संवाद’ होण्याचीच जास्त गरज आहे. आणि त्यायोगेच आपली ही गोड मातृभाषा टिकणार आहे. मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
आज मराठीचं संवर्धन करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि ते आपणच केलं पाहिजे. नाहीतर काही वर्षांनी जगातल्या मृतप्राय भाषांच्या यादीत मराठीचं नाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी फार काही करण्याची गरज नाही. फक्त दैनंदिन जीवनात मराठीचा जाणीवपूर्वक वापर केला तरी पुष्कळ झालं. त्यासाठी खालील काही गोष्टी आपण नक्कीच करू शकतो .
१) “शक्य तेथे मराठी आणि आवश्यक तेथे इंग्रजी (किंवा अन्य भाषा)” असं ब्रीदवाक्य ठेवून त्याप्रमाणे वागावं.
२) कुणीही भेटलं तरी , Hi-Hello ऐवजी ‘नमस्कार’ असं म्हणून संभाषणाला सुरुवात करावी . 
    दूरध्वनी वरील संभाषणाची सुरुवातही ‘Hello’ ऐवजी ‘नमस्कार’ म्हणून करावी.
३) ‘Good Morning’ , ‘Good Night’ ऐवजी ‘सुप्रभात’ , ‘शुभरात्री’ असं म्हणावं.
४) कुठल्याही शुभप्रसंगाच्या किंवा भारतीय सणांच्या शुभेच्छा मराठीत द्याव्यात . उदा.  Happy Diwali ऐवजी 
   ‘शुभ दीपावली’ म्हणावं. Happy Birthday ऐवजी “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” या शब्दांत शुभेच्छा
    द्याव्यात.
५) महाराष्ट्रात कुठेही वावरताना प्राधान्य मराठीला द्यावं. कुणाला काही विचारायचं झाल्यास पहिला प्रश्न मराठीतच
    विचारावा. (आज मुंबई सारख्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या महानगरात मराठी माणसांकडूनच मराठीची होत 
    असलेली उपेक्षा पाहिली कि मनस्वी संताप येतो. )
६) संगणकावर मराठीचा वापर होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.
७) मराठीबद्दल कमीपणाची भावना मनात न ठेवता तिचा अभिमान बाळगावा आणि त्याप्रमाणे वागावं.
८) शक्य झाल्यास आपली स्वाक्षरी मराठीत असावी.
९) आपल्या मुलांना ‘मम्मी – पप्पा’ ऐवजी ‘आई-बाबा’ म्हणायला शिकवावं. (आता कृपया पुन्हा कुणी ‘भाषेपेक्षा 
    भावना महत्वाची’ असं म्हणू नये).
खरं तर या विषयावर जेवढं बोलावं , लिहावं तेवढं थोडंच आहे. पण फेसबुक वर एवढं सगळं वाचायला सगळ्यानांच वेळ मिळेल असं नाही. शेवटी एवढंच म्हणेन ....
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
सुरेश भटांच्या या अप्रतिम काव्यासह आपणां सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या मनापासून शुभेच्छा ....!!
धन्यवाद......!!!!! 
(टीप: सुरेश भटांची ही अप्रतिम रचना(मराठी अभिमान गीत) संगीतकार श्री. कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केली आहे. ती सर्व मराठी जनांनी एकदा अवश्य ऐकावी.)
- नवज्योत वेल्हाळ 
navjyotvelhal2009@gmail.com
९४२१४३८००७, (०२३५९)२४३५५३